नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकार
गौरव गागडे | मुंबई | 8ऑक्टोबर २०२५
बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) अखेर प्रवाशांसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की नव्या विमानतळाला लोकनेते दीनकर बाळू (डी. बी.) पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून या नव्या नावास मान्यता देण्यात आली आहे.
डी. बी. पाटील हे नवी मुंबई परिसरातील सुप्रसिद्ध शेतकरी नेते होते. शहराच्या विकासासाठी ज्या कुटुंबांची जमीन संपादित करण्यात आली, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि योग्य मोबदल्यासाठी त्यांनी मोठी लढा दिली होती. आगरी आणि कोळी समाजासाठी या विमानतळाला त्यांचे नाव जोडले जाणे ही त्यांच्या संघर्षाची अधिकृत दखल मानली जात आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनाला एक सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

विमानतळाबाबत अधिक माहिती अशी की, NMIA सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. याचे टर्मिनल कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित अनोख्या डिझाइनमध्ये बांधलेले आहे. पहिल्या टप्प्यातील टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार असून त्याची वार्षिक प्रवासी क्षमता २० दशलक्ष (कोटी) प्रवाशांची आहे. तसेच, विमानतळ सुमारे ८ लाख टन मालवाहतूक हाताळू शकणार आहे.
पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, हा विमानतळ दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवासी आणि ३ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता प्राप्त करेल. त्यामुळे NMIA आशियातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक केंद्रांपैकी एक ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाले आहे. हे नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील दुसरे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार असून, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होईल.



