श्रावणी खानविलकर । मुंबई । २९ जुलाई, २०२५
नागपूरची रहिवासी दिव्या देशमुख हिने वयाच्या १९व्या वर्षी भारताची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ विश्वविजेती म्हणून इतिहास रचला आहे. दिव्याने लहानपणापासूनच बुद्धिबळाचे शिक्षण घेतले होते. २०१० मध्ये वयाच्या केवळ ५व्या वर्षी तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. २०२३ मध्ये तिने ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ ही पदवी मिळवली. वयाच्या १७व्या वर्षी दिव्याने दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद पटकावले. गेल्या वर्षी तिने ‘वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन’ हा किताब जिंकला होता आणि आता तिने ‘ग्रँडमास्टर’ पदवीही प्राप्त केली आहे.

FIDE महिला वर्ल्ड कपमध्ये हे पहिल्यांदाच घडले, जेव्हा दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर होते – कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख. त्यांच्या दोघींमधील पहिल्या दोन्ही क्लासिक खेळ अनिर्णीत राहिले. मात्र तिसऱ्या फेरीत दिव्याने बाजी मारली आणि ती भारताची पहिलीच तरुण महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती ठरली.
भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून तिचे मनापासून अभिनंदन केले.



