श्रावणी खानविलकर । मुंबई । 30 जुलाई, 2025
मुंबई लोकल रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे जाऊन विचार केला आहे. विविध अॅप्स सुरू केले आहेत – जसे की एम-इंडिकेटर, UTS – यांचा प्रवाशांनी नेहमीच उपयोग करताना दिसून येतो. परंतु सध्या काही प्रवासी या गोष्टींचा गैरफायदा घेताना दिसत आहेत.

UTS या अॅपमुळे प्रवाशांसाठी तिकीट काढणे सोपे झाले आहे. त्यामुळे तिकीट काऊंटरवर लागणार्या लांबच लांब रांग टाळता येतात. UTS च्या QR कोडच्या माध्यमातून प्रवासी तिकीट काढतात. पण अलीकडे या सुविधेचा गैरवापर वाढलेला दिसतोय. अनेक बिनतिकीट प्रवासी या QR कोडचा फोटो मोबाईलमध्ये ठेवून T.C. समोर आल्यावरच तिकीट काढतात. यामुळे ते दंडापासून बचावतात आणि T.C. साठी काम करणेही कठीण होते आहे.
त्यामुळे ही सेवा तत्काळ बंद करण्यात यावी, अशी शिफारस मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डला पत्र पाठवून केली आहे. प्रवाशांच्या अशा गैरवापरामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी रेल्वे बोर्ड काय कारवाई करेल?
या अॅपवर बंदी येणार का? की या अॅपमध्ये काही बदल करण्यात येणार? असे अनेक प्रश्न सध्या प्रवाशांच्या मनात निर्माण झाले आहेत. रेल्वे बोर्डच्या पुढील कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



